लोकसत्ता टीम | March 9, 2017 3:06 AM
डॉ. धनागरे यांचे वेगळेपण हे की भारतीय संस्कृतीत असलेले शेतीचे महत्त्व आणि त्यातून निर्माण झालेले सामाजिक प्रश्न त्यांना अधोरेखित करावेसे वाटले..
संस्कृतीमधील अंतर्गत ताणेबाणे, समाजाची विचार करण्याची पद्धत, त्याचे विविध परंपरांवर होणारे परिणाम, त्यातून निर्माण होणारी विचारांची नवी साखळी असा विस्तृत आवाका असल्याशिवाय समाजशास्त्रातील संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. परंपरांच्या मागे असलेल्या मानसिकतेचे अर्थ उलगडण्यासाठी प्रज्ञा उपयोगी ठरते. डॉ. धनागरे हे असे प्रज्ञावंत होते..
डॉ. द. ना. धनागरे यांच्यासारख्या साक्षेपी विचारवंताच्या लेखनाचे दाखले जागतिक पातळीवर दिले जात असले, तरी त्यांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात मात्र त्यांची ओळख सीमित राहिली. अर्थात धनागरे यांना त्याबद्दल कधीही खंत वाटली नाही, ही गोष्ट वेगळी. सुमारे सहा दशके उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यापन आणि अभ्यास करणाऱ्या धनागरे यांनी केलेले काम इतके आहे, की एका आयुष्यात इतक्या विविध विषयांवर, इतक्या विपुल प्रमाणातील लेखनाचा तो एक वस्तुपाठ ठरावा. त्यामुळेच डॉ. धनागरे यांच्यासारख्या विचारवंत संशोधकास जागतिक पातळीवर मिळालेली पावती आदराची होती.
सार्वजनिक सभा-समारंभात रमण्यापेक्षा बुद्धिमंतांच्या मेळ्यात त्यांना अधिक रस वाटे याचे कारण आपले विचार लादत राहण्यापेक्षा चर्चेतून त्यास आणखी नवी परिमाणे मिळण्याची त्यांना खात्री असे. विद्यापीठीय शिक्षणपद्धतीबरोबरच आयआयटीसारख्या संस्थेत अध्यापनाचे कार्य करताना त्यांना अभ्यासाचा आणि संशोधनाचा जो विस्तार जाणवला, त्यातून त्यांच्या कर्तृत्वाला दिशा मिळाली. त्याच काळात त्यांनी इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठातून डी. फिल. ही पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन आजही अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. १९२० ते ५० या काळातील भारतातील शेतकऱ्यांची चळवळ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. मध्यमवर्गीय घरातून शिकत शिकत पुढे आलेल्या धनागरे यांना शेतीच्या अभ्यासाची संधी मिळणे शक्य नव्हते. परंतु या चळवळीचा सामाजिक अंगाने अभ्यास करून देशी परंपरांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अशा चळवळींवर कसा आणि कोणता परिणाम होतो, याचे साद्यंत विवेचन त्यांनी केले. हा विषय त्यांच्या आयुष्यभराचा ध्यास राहिला, त्यामुळे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झालेल्या चळवळीचे येथील राजकारणावर आणि समाजकारणावर कोणते परिणाम झाले, याचा अभ्यास त्यांनी अगदी अलीकडच्या काळात इंग्रजीतून ग्रंथरूपाने सादर केला. त्यास जागतिक पातळीवर मान्यताही मिळाली. जगभरच्या अभ्यासकांना भारतीय शेती चळवळीत क्रांतिबीजे दिसतच नसत. स्वातंत्र्योत्तर काळातच शेतकरी चळवळीला राजकीय भान आले, असे त्या अभ्यासकांचे एकमत. परंतु धनागरे यांनी हे एकारलेले म्हणणे साधार खोडून काढले. भारतातील सामाजिक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जगण्याचा असा अभ्यास फारसा झाला नाही किंवा कुणाला करावासा वाटला नाही. डॉ. धनागरे यांचे वेगळेपण हे की भारतीय संस्कृतीत असलेले शेतीचे महत्त्व आणि त्यातून निर्माण झालेले सामाजिक प्रश्न त्यांना अधोरेखित करावेसे वाटले.
समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी इतिहास या विद्याशाखेने निर्माण केलेल्या संदर्भसाधनांचा वापर करण्याऐवजी सामाजिक इतिहासाच्या संशोधनावर डॉ. धनागरे यांनी भर दिला. डॉ. जी. एस. घुर्ये, ए. आर. देसाई, पी. सी. जोशी यांच्यासारख्या थोर अभ्यासकांपेक्षाही धनागरे निराळे ठरतात, ते या अभ्यासपद्धतीमुळे. ऐतिहासिक साधनांचा असा उपयोग करताना अभ्यासकाकडे वस्तुनिष्ठपणा आणि मोकळेपणाही असणे आवश्यक असते. मोकळेपणातून येणारी समन्यायी अभ्यासदृष्टी धनागरे यांच्या सर्वच लिखाणातून दिसते. यात भावनिक पूर्वग्रह कोठेही नसत. धनागरे मूळचे विदर्भाचे. बापूसाहेब अणे यांचे ते चरित्रकार, अशीही त्यांची एक ओळख. वेगळय़ा विदर्भाच्या मागणीचा १९३० च्या दशकापासूनचा इतिहास त्यांना ज्ञात होता. परंतु विदर्भ राज्यनिर्मितीची मागणी केवळ राजकीय मागणी म्हणून रेटणाऱ्या अलीकडच्या वैदर्भीय नेत्यांवर टीकेचे नेमके बोट ठेवले ते धनागरे यांनीच. पश्चिम महाराष्ट्राला दोष देणाऱ्या वैदर्भीय नेत्यांनी अनुशेष भरावा म्हणून ना प्रयत्न केले, ना अनुशेषामागील प्रश्न ओळखून आंदोलने उभारली. याकडे सडेतोडपणे – या नेत्यांची नावे घेऊन- लक्ष वेधले ते धनागरे यांनीच. अर्थात हे झाले केवळ एक उदाहरण.
समाजशास्त्रासारख्या विद्याशाखेत केवळ संशोधनाने अनेक गोष्टी सिद्ध होत नाहीत. त्यासाठी विस्तीर्ण पटलावर अभ्यास करणे आवश्यक असते. संस्कृतीमधील अंतर्गत ताणेबाणे, समाजाची विचार करण्याची पद्धत, त्याचे विविध परंपरांवर होणारे परिणाम, त्यातून निर्माण होणारी विचारांची नवी साखळी अशा फार मोठय़ा विषयाचा आवाका असल्याशिवाय समाजशास्त्रातील संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. शिवाय त्यामध्ये संशोधनाची काटेकोर शिस्त लागते. संशोधनाच्या अशा क्षेत्रांत प्रज्ञेला अधिक महत्त्व असते. परंपरांच्या मागे असलेल्या मानसिकतेचे अर्थ उलगडण्यासाठी ही प्रज्ञा उपयोगी ठरते. डॉ. धनागरे हे असे प्रज्ञावंत होते. कुटुंबव्यवस्थेपासून ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या चळवळीपासून ते भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हानांपर्यंत अनेक विषयांत त्यांना रस वाटला. त्यातूनच ‘भारतीय कुटुंबव्यवस्था नव्या औद्योगिक रचनेमुळे निर्माण झालेल्या ताणातही टिकून राहील,’ असे सहज न पटणारे प्रतिपादन ते अभ्यासपूर्वक करू शकले. धनागरे यांनी जगभर फिरताना आपली सारी ज्ञानेंद्रिये सतत जागती ठेवली. त्याला अभ्यासाची, संशोधनाची जोड दिली आणि त्यातून त्यांना नव्या विचारप्रणालीस जन्म देता आला.
विविध शिक्षणसंस्थांमध्ये डॉ. धनागरे यांनी अध्यापक म्हणून कार्य केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद हे त्यांच्या एकूण सहा दशकांच्या शैक्षणिक कारकीर्दीत एक महत्त्वाचे पर्व ठरले, याचे कारण त्या पदावर राहून त्यांना समाजातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा अनुभव घेता आला. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनीही हे कधी नाकारले नाही. अभ्यासाच्या क्षेत्रात या विचारांनी प्रभावित होऊन आपले संशोधन विशिष्ट दिशेला वळवण्याचाही त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारतातील बुद्धिमंतांचे नियतकालिक असलेल्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकली’सारख्या अग्रगण्य नियतकालिकाचे ते दीर्घकाळ लेखक राहिले. आपल्या संशोधनाचा विशिष्ट विचारसरणीशी संबंध जोडण्यामुळे ते संशोधन कमअस्सल होण्याचा धोका ते चांगलाच ओळखून होते. या पाश्र्वभूमीचा परिणाम कुलगुरूपदाच्या काळात मात्र त्यांना भोगावा लागला. तत्त्वांशी प्रतारणा करणे त्यांच्या स्वभावात नसल्याने आणि विचारांना शास्त्रकाटय़ाची कसोटी लावण्याची सवय असल्यामुळे, त्या वेळी कॉपीविरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे शिक्षण क्षेत्रात स्वागत झाले, मात्र राजकीय पातळीवर त्याची अश्लाघ्य टिंगल झाली. धनागरे त्यामुळे डगमगले नाहीत. मात्र घरी येणाऱ्या अर्वाच्य भाषेतील दूरध्वनींमुळे त्यांच्या पत्नीला मानसिक आजारास सामोरे जावे लागले. आपल्याकडे विचारवंतांना कोणत्या तरी कप्प्यात बसवल्याशिवाय त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. डॉ. धनागरे हे त्यास अपवाद ठरले. नेमस्तपणे ते अखेपर्यंत आपले काम सातत्याने करीत राहिले.
डॉ. धनागरे यांची महाराष्ट्रास पुरेशी ओळख झाली नाही. एरवी एकाच ग्रंथाने आंतरराष्ट्रीय विचारवंत अशी मान्यता मिळवणारे विद्वान या महाराष्ट्रात जागोजागी सापडतात. विद्यापीठीय संशोधन किती कमअस्सल होत चालले आहे, याची खंत जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या धनागरे यांना महाराष्ट्रातील विचारवंतांच्या मांदियाळीत खरे तर फार वरचे स्थान मिळावयास हवे. संकल्पनांचे विश्व आणि सामाजिक वास्तव, नागरी समाज, राज्यसंस्था आणि लोकतंत्र, विकासाचे समाजशास्त्र, पर्यावरण आणि विकास, ग्रामीण भारतातील समाजाची रचना, प्रादेशिकतावादाने निर्माण होत असलेली नवी सामाजिक ओळख यांसारख्या अनेक विषयांत त्यांनी संशोधन केले. विषयांचा हा विस्तार पाहिला म्हणजे किती मोठय़ा वैचारिक पातळीवर ते आयुष्यभर काम करीत होते हे लक्षात येईल आणि कोणत्याही प्रश्नास समाजशास्त्राच्या अंगाने कसे भिडता येते, हेही. जगातल्या अनेक विचारवंतांना त्यांच्या या नव्या मांडणीचे आकर्षण वाटले, याचे कारण त्यांनी या प्रश्नांना असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिमाणांचे संशोधन केले. धनागरे यांनी अशा विविध शाखांना एकत्र घेऊन संशोधन कसे करता येते हे सिद्ध केलेच, पण कुलगुरू म्हणून दबाव न स्वीकारता, ते अखेरचेच आदरणीय कुलगुरू ठरले. त्यांच्यासारख्या विचारवंताचे निधन ही त्यामुळेच अतिशय क्लेशदायक घटना ठरते. ‘लोकसत्ता’तर्फे त्यांना मन:पूर्वक आदरांजली
No comments:
Post a Comment